Maharashtra Rains: येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता, पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली
Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागानं (Department of Meteorology) वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज‌ अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 10 इंच झाली आहे.त्यामुळे चिखली ता.करवीर येथील नागरिकांना प्रशासन आणि पोलीस यांच्या कडून स्थलांतरीत केले जात आहे. (हे देखील वाचा: (Nashik Rains: नाशकात धबधब्याजवळ अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका तर 1 जण वाहून गेल्याची शक्यता)

Tweet

मुंबईत सोमवारी रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे मुंबईच्या काही सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. सकाळी कामाच्या वेळी रस्ते वाहतुकीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला तर बस आणि लोकल वाहतूक 5 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या.