Thane City Cleanliness | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Thane City Cleanliness: धुलिवंदन (Dhuli Vandana) आणि होळी सण (Holi Festival) ठाणे (Thane) शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरे केले. पण, होळीनंतर निर्माण झालेल्या कचऱ्याचे काय? असा सवाल ठाण्यातील नागरिकांना सतावतो आहे. शहरातील अनेक नागरिकांनी सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर पोस्ट लिहीत आणि छायाचित्रे सामायिक करत आपला संताप व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांचा दावा आहे की, त्यांच्या नागरी वसाहती आणि रस्त्यांवर कचऱ्यांचा खच पडला आहे. ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाठिमागील चार दिवसांपासून परिसरातील कचराच उचलला नाही. परिणामी, नागरिकांना मोठ्या दुर्गंधीस तोंड द्यावे लागत आहे.

हिरानंदानी इस्टेट परिसरात कचरा

ठाणे महापालिका आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सजग नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अ‍ॅड. अनुभा श्रीवास्तव सहाय नामक व्यक्तीने आपल्या @anubha1812 या एक्स हँडलवरुन प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, 'हिरानंदानी इस्टेट ठाणे येथे गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यांवर कचरा साचला आहे. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. यामुळे हजारो रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत आहेत. (हेही वाचा, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन (Watch Video))

पाटीलपाडा येथील रुतु इस्टेटमध्ये घाणीचे साम्राज्य

श्रीमती गांगुली नामक एक्स वापरकर्त्याने @sshivamca या एक्स हँडलवरुन ठाणे महापालिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत म्हटले आहे की, रुतु इस्टेट, ठाणे पाटलीपाड्यातील एक मोठी नागरी वसाहत आहे ज्यामध्ये 1000 हून अधिक नागरिकांसह राहतात. या परिसरात गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलणे बंद आहे, त्यामुळे तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ भारत अभियान रुतू इस्टेटसाठी नाही का? असा सवालही गांगुली उपस्थित करतात.

तुळशीधाम परिसरात अनेक महिन्यांचा कचरा साचला

KPR नावाच्या वापरकर्त्याने @BigBruhDatBruhs या एक्स हँलवरुन पोस्ट करत म्हटले आहे की, धर्मवीर नगरजवळ तुळशीधामकडे जाणारा हा कचऱ्याचा ढिगारा पहा. अनेक महिन्यांपासून कचरा उचलला जात नाही आणि याकडे या तुम्ही (TMC) पूर्णपणे दुर्लक्ष करता. या वापरकर्त्याने थेट व्हिडिओच सामायिक केला आहे.

यशस्वी नगर परिसरात रस्ता उकरला, कचरा साचला

Ajit Menon नावाच्या वापरकर्त्याने @ajitmenon82 या एक्स हँडलवरुन पोस्ट करत म्हटले आहे की, ठाणे येथील यशस्वी नगरजवळ पाईपलाईन रस्ता भूमिगत पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आला. बॅकफिलिंग अशा प्रकारे केले जाते की, रस्त्याचा अर्धा भाग निरुपयोगी आहे. उत्खनन केलेला गाळ साफ झालेला नाही. कचरा साफ केला जात नाही. त्यांनी आपली प्रतिक्रिया @TMCaTweetAway आणि @ThaneLive या दोन हँडल्सना टॅग केली आहे.

उथळसर परिसर परिसरात कचऱ्याचे ढिग

धर्मेंद्र एन सिंग नामक वापरकर्त्याने @dharamendranar1 या एक्स हँडलवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ठाणे शहरातील उथळसर परिसर परिसरात बाबूभाई पेट्रोल पंपासमोर, MTNL गेट समोर प्रचंड प्रमाणात कचरा साचला आहे. पाठिमागील चार दिवसांपासून कचराच उचलला गेला नाही. पाठिमागील तीन महिन्यांपासून तक्रार केली तरीही पाण्याची गळती दुरुस्त झाली नाही. धर्मेंद्र यांनी कचऱ्याचे ढिग साचलेली छायाचित्रेही आपल्या पोस्टसोबत जोडली आहेत. आपली पोस्ट त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (@CMOMaharashtra) भाजप (@BJP4India), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) आणि @MoHFW_INDIA, @moefcc, @SwachhBharatGov या एक्स हँडल्सना टॅग केली आहे.

ठाणे महापालिका एक्स पोस्ट

दरम्यान, ठाणे महापालिकेने 14 मार्च रोजीच सोशल मीडिया मंच एक्सवर एक पोस्ट करत रंगांचा उत्सव साजरा करताना स्वच्छता राखुया असे म्हणत आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. दरम्यान, शहरात साचलेले कचऱ्याचे ढिग केव्हा उचलले आजाणार आणि नागरिकांना मोकळा श्वास केव्हा मिळणार याबाबत अद्यापतरी कोणतीही स्पष्टता नाही.