ग्रामीण महाराष्ट्रासाठी (Rural Maharashtra) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली घडत आहेत. आज राज्यातील तब्बल 1165 ग्रामपंचायतींसाठी सुरु असलेल्या निवडणुकांसाठी (Gram Panchayat Election 2022) मतदान पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, अवघी पंचक्रोशी, तालुका आणि जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. आज राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या अशा हजारो ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि जनतेतून थेट सरपंच निवडले जाणार आहेत. सकाळी सात वाजलेपासून मतदानाला सुरुवात झाली. हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
एकूण ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या 18 जिल्ह्यांपैकी 8 हे विदर्भातील आहेत. विदर्भात येणाऱ्या आठ जिल्ह्यांमध्ये 169 ग्रामपंचायती येतात. त्यातील चार जिल्ह्यांमधील 9 ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी शह-काटशाह सुरु आहेत. दरम्यन, सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका असलेला जिल्हा चंद्रपूर आहे.
दरम्यान, आज मतदान पार पडत असलेल्या 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवार, 17 ऑक्टोबर) पार पडणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडले जात असल्यामुळे जनतेच्या मनातला फैसला काय आहे याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, इतर सर्व ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजता मतदान पार पडले. अपवाद फक्त गडचिरोली जिल्ह्याचा. गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात मतदान असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत तिथे मतदान पार पडणारा आहे.