कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्याचे घोषित केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात राज्यपाल म्हणाले की, "विद्यापीठांच्या कोणत्याही प्रकरणाविषयी शेवटचा निर्णय हा कुलगुरूंचा असेल." टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कोश्यारी म्हणाले की, "परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा पुरेपूर विचार करुन घेण्यात आलेला नाही. तसंच परीक्षा घेण्याचा अंतिम निर्णय हा महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींच्या अनुषंगाने घेण्यात यावा." तसंच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणारा आहे, असेही मत राज्यपालांनी मांडले.
विशेष म्हणजे यासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी परीक्षा रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले असून त्यावर मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची ते वाट पाहत आहेत. (विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची 'ही' नवी भूमिका, वाचा सविस्तर)
रविवार, 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. तसंच विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांचे गुण हे पूर्वीच्या सत्रातील गुणांच्या सरासरीनुसार देण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपण अधिक चांगले गुण मिळवू शकतो असा आत्मविश्वास आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.