पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार यांच्यासह सरकारच्या 'या' कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा नाही, शासनाचा निर्णय जारी
CM Uddhav Thackeray | (Photo Credit : Twitter)

ठाकरे सरकारने 12 फेब्रुवारीला मंत्रिमंडळ बैठकीत 5 दिवसांच्या आठवड्याबाबत (five day week) निर्णय घेतला होता. त्यानुसार आता शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालये बंद राहतील. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी आता 29 तारखेपासून होणार आहे. महत्वाचे म्हणजे, 5 दिवसांचा आठवडा कोणास लागू नसेल हे तर, स्पष्ट केलेले आहेच, शिवाय 5 दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली होती. राज्यात केंद्राप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा करावा,अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा येत्या 29 फेब्रुवारीपासून आठवडा लागू होणार आहे. शनिवार आणि रविवारी सरकारी कार्यालये बंद राहतील. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी सुट्टी राहील. यासोबतच दररोज 45 मिनिटाचे वाढीव काम सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारी पासून होईल. हे देखील वाचा- महाराष्ट्रात सीएए लागू होणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशानात घोषणा करावी; समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मागणी

महत्वाचे मुद्दे-

- दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 पासू शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत असून शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस असतील.

- सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात येत असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी राहील.

- तसेच सर्व शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते सायांकाळी 6.30 अशी राहील.

- या कायालयीन वेळेमध्ये दिनांक 4 जून 2019 च्या शासन पदरपत्रकानुसार दुपारी 1.00 ते 2.00 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असेल.

ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात. अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही.