Government Formation in Maharashtra: धनंजय मुंडे यांनी अखेर मौन सोडलं, शरद पवार की अजित पवार? आपण कोणाच्या बाजूने सांगीतलं
Dhananjay Munde Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

Government Formation in Maharashtra: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडनाट्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आणि गेले दोन दिवस मौन बाळगून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अखेर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन ही प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे एक फायरब्रँड नेता म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात होती. अखेर त्यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार साहेबांसोबतच आहे, कुणी कोणताही संभ्रम निर्माण करू नये.' दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र आणि सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेनंतर मुंडे यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

धनंजय मुंडे हे चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याचे कारण म्हणजे, अजित पवार यांनी बंड केले आणि धनंजय मुंडे यांचा संपर्क तुटला. बराच वेळ ते कोणाच्याच संपर्कात नव्हते. त्यांचा फोनही संपर्क कक्षेच्या बाहेर होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या डोक्यात काही वेगळे तर, चालले नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. (हेही वाचा, शरद पवार, अजित पवार यांची वेगवेगळी भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदार जनता कोणासोबत?)

धनंजय मुंडे ट्विट

दरम्यान, धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मूळचे भाजपचे असलेले धनंजय मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल करुन घेण्यात अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. अजित पवार यांच्या पुढाकारानेच धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी प्रवास सुखकर झाला होता.