Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत मिळणार 'एवढा' बोनस
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

कोरोना महामारीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आर्थिक उत्पनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यामुळे येत्या दिवाळीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) मिळणार की नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिवाळी बोनसबाबत मोठी घोषणा करत पालिका कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घातली आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून यावर्षी 15 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे समजत आहे.

कोरोना संकटामुळे मागील 7 महिन्यांपासून सर्व काही पूर्णपणे ठप्प होते. परिणामी, पालिकेलाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. दरम्यान, या भयंकर परिस्थिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना 2019-20 वर्षातील उत्पन्नाच्या 20 टक्के इतका बोनस देण्यात यावा, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली होती. तर, म्युनिसिपल मजदूर संघाने 50 हजार रुपये बोनसची मागणी केली होती. दरम्यान, पालिकेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमध्ये कपात केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार, किशोरी पेडणेकर यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळी बोनसमध्ये 500 रुपयाची वाढ केल्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 15 हजार 500 रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे.

याशिवाय, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7 हजार 700 रुपये बोनस मिळणार. तर, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4 हजार 700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणांना रुपये बोनस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक आरोग्य स्वयंसेविका यांना भाऊबीजेची भेट म्हणून 4 हजार 400 रुपये देण्यात येणार आहेत. हे देखील वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून डिस्चार्ज मिळाल्याची दिली माहिती

कोरोनाच्या संकटात पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहे. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही अधिकाधिक बोनस मिळावा यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला होता. या दिवाळी बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर तब्बल 155 कोटींचा बोजा येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.