Gondia Crime: गोंदियात दगडाने ठेचून तरुण मजुराची हत्या,  हत्येमागील कारण अस्पष्ट
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गोंदियात (Gondiya) परराज्यातून रोजगारासाठी आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील मूर्री पोलीस स्टेशन हद्दीत 23 जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोंदियाच्या मुर्री गावात असलेल्या राईस मिलमध्ये मृतक तरुण रोजगारासाठी आलेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमानी त्या तरुणाची दगडाने ठेचून  (Gondia Crime News) निर्घृण हत्या केली.  गेल्या 15 दिवसात ही सलग दुसरी हत्या असल्याने गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे.   (हेही वाचा - Gondia Crime: माजी नगर सेवक कल्लू यादव गोळीबार प्रकरणात चार आरोपी अटकेत, दोन फरार)

बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे घडली होती. ज्यामध्ये चहाच्या टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

11 जानेवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू आणि माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच आता परत घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.