गेल्या काही दिवसांपासून सोने दर (Gold Prices) हे सर्वसामान्यांच्या आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. सातत्याने ही वाढ होतच राहिल्याने सोने खरेदी हा आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय ठरु लागला आहे. असे असतानाच ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. सोने दरात काहीशी घट झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 270 रुपयांनी घसरून 38,454 (प्रति दहा ग्रॅम) रुपयांवर आला आहे. तर, चांदी दरसुद्धा (Gold Prices) काहीशी दिलासादायक स्थिती आहे.
सप्टेंबर महिना हा सोने विक्रेत्यांसाठी आनंदाचे तर, ग्राहकांसाठी वेदनादाई ठरला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सोनेदर प्रतिदिन वाढतानाच पाहायला मिळाले आहेत. अपवादात्मक स्थितीत सोने दरात घसरण पाहायला मिळाली. पण, तीही केवळ नावापूरतीच. आतापर्यंत सोने प्रति दहा ग्रॅम 39,885 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, गेले तीन दिवस दिलासादायक वृत्त मिळत असून, सोने दर प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 2,300 रुपयांनी कमी होताना दिसत आहे. (हेही वाचा, Gold Rate: मुंबईच्या इतिहासात सोने दरात विक्रमी वाढ; पार केला प्रति तोळ्यासाठी 40 हजाराचा टप्पा, दिवाळीपर्यंत अजून महागण्याची शक्यता)
दरम्यान, सोने दरासोबत चांदीही वधारत होती. चांदी प्रति किलो 51,489 रुपये इतक्या उच्चांकी दरावर पोहोचली होती. मात्र चांदी दरातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीचा दर प्रति किलो 5 हजार रुपयांनी कमी होऊन तो 47,310 रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे फारसा आनंद नसला तरी, सोने,चांदी ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.