Global Luxury Real Estate Markets: जगात सर्वात महागड्या घरांच्या शहरांच्या यादीत मुंबई 8 व्या क्रमांवर; लक्झरी हाऊसिंग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ- Reports
Building | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Global Luxury Real Estate Markets: मुंबईत (Mumbai) स्वतःचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते, मात्र फार कमी लोक ते पूर्ण करू शकतात. दिवसेंदिवस मुंबईमधील घरांच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे शहरातील स्वतःच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच राहील की काय अशी भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत मुंबई आता जगातील टॉप 10 लक्झरी रिअल इस्टेट मार्केटपैकी (Luxury Housing Market) एक बनली आहे. बुधवारी मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँकने 2024 साठी संपत्ती अहवाल (Knight Frank's The Wealth Report 2024) प्रसिद्ध केला. त्यानुसार मुंबईतील लक्झरी निवासी किंमती वर्ष-दर-वर्ष 10 टक्क्यांनी वाढत आहेत. ही गोष्ट शहराची मजबूत आर्थिक वाढ आणि सतत उच्च रिअल इस्टेट मागणी हायलाइट करते.

तसेच, लक्झरी रेसिडेन्सीच्या बाबतीत, मुंबई आता जागतिक स्तरावर 8 व्या क्रमांकावर आहे, जे एका वर्षापूर्वी प्राइम इंटरनॅशनल रेसिडेन्शियल इंडेक्स (PIRI 100) मध्ये 37 व्या क्रमांकावर होते. जर एखाद्याला मुंबईत सुमारे प्राईम लोकेशनवर 1100 चौरस फुटांचे लक्झरी घर घ्यायचे असेल तर, त्याला अंदाजे 8 कोटी 29 लाख रुपये मोजावे लागतील.

दिल्ली आणि बेंगळुरूनेही घरांच्या किंमतीच्या बाबतीत सकारात्मक गती दर्शविली आहे. 4.2% वार्षिक वाढीसह, दिल्ली 77 व्या वरून 37 व्या आणि बेंगळुरू 59 व्या स्थानावर गेले आहे. शिशिर बैजल, चेअरमन, नाइट फ्रँक इंडिया, म्हणतात, 'जगातील टॉप 10 लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये मुंबईचा क्रमांक लागणे ही बाब शहराची ओळख दर्शवते. 2024 च्या दृष्टीकोनानुसार मुंबईची प्रमुख किंमत आणि वाढीचा अंदाज अतिशय आकर्षक आहे.’

याआधी 2023 मध्ये, जागतिक लक्झरी निवासी बाजारपेठेत सर्वाधिक सरासरी 26.3% किंमत वाढ मनिलामध्ये होती. दुबई, जे गेल्या वर्षी पहिल्या स्थानावर होते, ते 15.9% सह दुसऱ्या स्थानावर आहे. बहामासने 15% वाढीसह तिसरे स्थान मिळविले आहे. चौथ्या स्थानावर अल्गारवा, त्यानंतर कॅप टाउन, अथेन्स, इबिझा, मुंबई, शांघाय आणि यांचा नंबर लागतो. (हेही वाचा: E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार)

मुंबई हे भारतातील सर्वात महाग रिअल इस्टेट मार्केट आहे. तसेच आता जागतिक स्तरावर ते पहिल्या 10मध्ये पोहोचले आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता असूनही, भारताच्या लक्झरी निवासी बाजाराने उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. नाइट फ्रँकच्या ‘द वेल्थ रिपोर्ट 2024’ मध्ये असे दिसून आले आहे की, आशिया-पॅसिफिक क्षेत्र 2023 मध्ये जागतिक लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये 3.8 टक्के वाढीसह, अमेरिकेला मागे टाकून सर्वात मजबूत कामगिरी करणारा प्रदेश म्हणून उदयास आला आहे.