गौतमी पाटील (Gautami Patil) ही नृत्यांगणा जाहीर नृत्याच्या कार्यक्रमामध्ये करत असलेल्या काही अश्लील कृतींमुळे (Obscenity) मागील काही महिन्यांपासून चर्चेमध्ये आली आहे. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरूण तोबा गर्दी करत असले तरीही अनेकांनी गौतमीच्या नृत्यादरम्यानच्या काही कृतींवर आक्षेप नोंदवला होता. आता गौतमी समोर याचमुळे अडचणी वाढणार असल्याचं चित्र आहे. कारण सातारा न्यायालयाने आता गौतमी पाटील वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिमा शेलार यांनी गौतमीच्या नृत्यामध्ये अश्लीलता असल्याचं सांगत तिच्याविरूद्ध तक्रार नोंदवली आहे. त्याची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटील वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. लावणी ही लोककला आहे. ती सादर करण्याच्या नावाखाली काही अश्लील बाबी होत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाही असे ठाम मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यामध्ये लावणी कलाकार मेघा घाडगे यांचा देखील समावेश आहे.
अनेक लावणी कलाकारांनी गौतमीने जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे.
26 वर्षीय गौतमी पाटील हीचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडीया मध्येही ती लोकप्रिय आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार लवकरच गौतमी रूपेरी पडद्यावर देखील दिसणार आहे. 'घुंगरू' सिनेमामधून ती रसिकांच्या भेटीला येणार असल्याचंही समजते आहे. टिक टॉक स्टार आणि लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटील ओळखली जाते. तिच्या अनेक जाहीर कार्यक्रमात हुल्लडबाजी झाल्याच्या, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा यामुळे तिचे कार्यक्रमही लाईव्ह शो दरम्यान बंद करण्याची नामुश्की ओढावली आहे.