
Sessions Court's Remarks On Obscenity: मुंबईच्या सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) अश्लीलतेसंदर्भात (Obscenity) एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी महिलेला 'तू सडपातळ आहेस, खूप हुशार आहेस आणि गोरी दिसतेस, मला तू आवडतेस' असे संदेश पाठवणे अश्लीलता असल्याचे मुंबईच्या सत्र न्यायालयाने म्हटले आहे. माजी नगरसेवकाला व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवल्याबद्दल एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जी. ढोबळे यांनी हे निरीक्षण नोंदवले.
दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, अश्लीलतेचे मूल्यांकन त्या काळातील सामाजिक मानके लागू करणाऱ्या सरासरी व्यक्तीच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. न्यायालयाने नमूद केले की तक्रारदाराला रात्री 11 ते 12.30 दरम्यान छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यात आले होते, ज्यात 'तू सडपातळ आहेस', 'तू खूप हुशार आहेस', 'तू गोरी आहेस', 'मी 40 वर्षांची आहे', 'तू विवाहित आहेस की नाही?' आणि 'मला तू आवडतेस' असे संदेश पाठवण्यात आले होते. (हेही वाचा - Ram Gopal Yadav On Instagram Reels: 'लोक असे कपडे घालतात की नजर खाली करावी लागते'; राम गोपाल यादव यांनी संसदेत व्यक्त केली अश्लीलता आणि ऑनलाइन गेमिंगबाबत चिंता)
कोणतीही विवाहित महिला हे खपवून घेणार नाही -
न्यायालयाने म्हटले आहे की, कोणतीही विवाहित महिला किंवा तिचा पती असे व्हॉट्सअॅप संदेश आणि अश्लील छायाचित्रे सहन करणार नाही. त्यात असे संदेश पाठवणारा अनोळखी असेल तर कदापिही नाही. आरोपींनी त्यांच्यात कोणतेही संबंध असल्याचे दाखविणारा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. न्यायाधीशांनी असे म्हटले की हे संदेश आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे आहे. (हेही वाचा - HC On Mom Posting Video Of Kids Painting Her Nude Body: 'नग्नता' आणि 'अश्लीलता' हे नेहमीच समानार्थी नसतात, स्त्रीला स्वत:च्या शरीराबद्दल स्वायत्त निर्णय घेण्याचा अधिकार- केरळ हायकोर्ट)
आरोपीला 2022 मध्ये झाली होती शिक्षा -
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला 2022 मध्ये मुंबईच्या एका दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले. आरोपीने असा दावा केला की, त्याच्या राजकीय वैमनस्यामुळे त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे, परंतु न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि म्हटले की, त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.