पुणे (Pune News येथील श्रीगौड ब्राम्हण समाज (Gaud Saraswat Brahmin Community) जातपंचायतीने एका कुटुंबाला चक्क 23 वर्षे वाळीत टाकल्याचा प्रकार पुढे येत आहे. समाजाच्या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरुन बिबेवाडी (Bibwewadi Police Station) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिताने अनेक अर्जविनंत्या केल्या तरीही समाजाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांत तक्रार देण्यापूर्वी पीडित व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला.
पुणे येथील श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या एका व्यक्तीने ब्राह्मण समाजाच्या मुलीसोबत विवाह केला नाही. केवळ या कारणास्तव एका व्यक्तीला जातपंचायतीने 23 वर्षांपूर्वी समाजाने वाळीत टाकले. समाजाने आपल्यावरचा बहिष्कार मागे घ्यावा यासाठी पीडित व्यक्तीने अनेक अर्जविनंत्या केल्या. परंतू, समाज बधला नाही. समाजाने आपला बहिष्कार कायमच ठेवला. त्यामुळे पीडिताला अनेक मानसिक त्रास आणि समाजिक छळाला सामोरे जावे लागले. परिणामी त्रास सहन न झाल्याने पीडित व्यक्तिने पोलिसांमध्ये तक्रार दिली. (हेही वाचा, Inter-Caste Marriage: आंतरजातीय विवाहामुळे नंदीवाले समाजातील 150 कुटुंबांवर बहिष्कार; पंचांविरुद्ध गुन्हे दाखल)
बिबेवाडी पोलिसांनी तक्रारदार प्रकाश नेमचंद डांगे (वय ४६ रा.हरपळे गल्ली गणपती मंदिर शेजारी , फुरसुंगी पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ताराचंद काळूरम ओजा ,भरत नेमचंद मावणी, प्रकाश लालूचांद बोलद्रह उर्फ शर्मा, संतोष उणेसा, मोतीलाल भोराम शर्मा डांगी, बाळू शंकरलाल डांगी, प्रकाश असुलाल ओजा, भवरलाल डांगी, हेमराज ओजा यांचा समावेश आहे. हे सर्वजण जात पंचायतिचे सदस्य आहेत.