गणेशोत्सवाचा सण (Ganeshotsav 2023) अवघ्या काही तासांवर आला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवात पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या गणेशोत्सवाच्या काही तासांपुर्वीच पुणेकरांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. शहरातील मध्यवस्तीत दोन दिवसांचा वाहतूक बदल करण्यात आला आहे. काही मार्ग यावेळी बंद देखील करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Mumbaicha Raja First Look: मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार)
गणेशोत्सवाच्या निम्मीताने वाहतुक शाखेच्या वतीने हा बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे शहरात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल हे मोठ्या प्रमाणात डेंगळे पूल ते शिवाजी पुलाच्या श्रमिक भवन समोर आहेत. याशिवाय कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौकात देखील अनेक स्टॉल आहेत. यामुळे शिवाजी रोड- गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. 18 ते 19 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री 12 दरम्यान वाहतूक बदल असणार आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक ते टिळक चौक केळकर रस्ता - फुटका बुरुज ते टिळक चौक तसेच कुमठेकर रस्तावरील शनिपार ते टिळक चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते गाडगीळ पुतळा, जेधे चौक ते टिळक चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्तावरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.