गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडा; आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
Ashish Shelar | (File Photo)

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Kokan) जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या 72 विशेष गाड्या फुल झाल्याने रेल्वेने चाकरमान्यांसाठी अजून गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. पुणे दौऱ्यादरम्यान आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. (Ganpati Festival 2021 Special Trains: बाप्पा पावला! मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा)

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येत कोकणात जातात. त्यांच्यासाठी दरवर्षी विशेष गाड्या रेल्वेकडून सोडण्यात येतात. यंदाही 72 विशेष गाड्यांची सोय करण्यात आली होती. मात्र त्यांचे बुकींग फुल झाले आहे. परंतु, अद्याप अनेकजण वेटिंग लीस्टमध्ये आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी अधिक गाड्या सोडण्याची मागणी आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीत त्यांनी 2019 प्रमाणे यंदाही अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, असे म्हटले आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. (Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

दरम्यान, 2019 रोजी कोकण रेल्वेवर 210 फेऱ्यांची सोय करण्यात आली होती. रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडण्यात आले होते. त्याचबरोबर बुकींगसाठी देखील अधिकच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे अनेकांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नाही. त्यामुळे ती कसर यंदा चाकरमानी भरुन काढणार, असे दिसते.

कोविड-19 संकट अद्याप कायम असून यंदाही गणेशोत्सवावर त्याचे सावट आहे. त्यामुळे यंदाचाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसंच विशेष नियमही लागू करण्यात आले आहेत.