Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव (Public Ganeshotsav) साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh's) यांनी केले आहे. यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Ganeshotsav 2020: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव 2020 साठी महाराष्ट्र सरकारची मार्गदर्शक सुचना जाहीर)

नागरिकांनी पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करावे. यात साथीच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असं आवाहनही अनिल देशमुख यांनी केलं आहे.