वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला. आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे अतिथीगृह सह्याद्री येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 75 वर्षे वयोगटातील नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यासोबतच, दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विमा संरक्षणाचा हप्ता सरकार भरणार आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे ऑगस्ट 2022 पासून राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्क्यांवर जाईल. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. (हेही वाचा: शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून)

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले. राज्यात सुपरमार्केटमध्ये वाइनविक्रीस परवानगी देणारा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करायचा की, कायम ठेवायचा याबाबत विचार सुरू आहे.