Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Palghar Mokhada Fire: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ब्राह्मण पाडा गावातील एका कुटुंबासाठी होळीची रात्र काळरात्र ठरली. होळीच्या रात्री घराला लागलेल्या आगीत वृद्ध सासू, सून आणि दोन नातवंडांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच मुलगा आणि दोन नातवंड आगीत गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून मोळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास अनंता मोळे यांच्या घराला आग लागली. आग लागली त्यावेळी घरात एकूण सात जण उपस्थित होते. थोड्याच वेळात आगीने भीषण रुप धारण केलं. त्यामुळे अनंता यांची चार मुलं, पत्नी आणि वृद्ध आई आगीत अडकले. यात अनंता मोळे यांची दोन मुलं, आई आणि पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (वाचा - Pune Fire Update: पुणे येथील फॅशन स्ट्रिट भीषण आग दुर्घटना, अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू)

या आगीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांची नावे पुढील प्रमाणे आहेत. गंगुबाई मोळे (वय 78), द्वारका अनंता मोळे (वय 46), पल्लवी अनंता मोळे (वय 15), कृष्णा अनंता मोळे (वय 10 वर्ष). याशिवाय अनंता मोळे, अश्विनी अनंता मोळे, भावेश अनंता मोळे हे या आगीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, बिहारमधील गया येथे होळी दहनाच्या वेळी तीन मुलांचा मृत्यू झाला, रविवारी रात्री बोधगयामध्ये होलिका दहननंतर लुकवारी टाकताना जळत्या आगीत तीन मुलांचा मृत्यू झाला. डोंगरावरील झाडीला लागलेल्या आगीमुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.