माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्याबद्दल विधान करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी बीड (Beed) येथील संविधान महासभेत केले आहे. अद्याप यावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या विधानावरून काँग्रेस काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर हे तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टिका विरोधांकडून वारंवार केली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबतीत विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवायला तयार नव्हते. मात्र, अहमदाबाद, पाटणा येथील काही विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश यांनी अंदोलन पुकारले होते. आताही देशात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. आता मात्र, त्यांची संख्या कमी आहे. मात्र, यातूनच नवे नेते समोर येतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. हे देखील वाचा- एका गाडीत बसू शकलो नाही, पण एकाच स्टेशनवर आलो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
याआधीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबदल वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला पायधुनी येथे भेटायला जायच्या, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता.