महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) दुसऱ्या टप्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपली उपस्थिती दाखवली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्यसरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार झालेल्या भाजपला नकळत चिमटा काढला आहे. आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत. यापुढे राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित काम केले तर, महाराष्ट्र- दिल्ली विकासाची मेट्रोला सुरूवात करता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई पाठोपाठ आता नागपूरमध्येही मेट्रो नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो अॅक्वा लाईनचा पहिला भागाला आज 28 जानेवारी रोजी सुभाषनगर मेट्रो स्थानकावर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ लिंकच्या मदतीने नागपूर मेट्रो प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवत त्याचे लोकार्पण केले. या वेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांचीदेखील उपस्थिती होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केले आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे? श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, जनतेचा अशिर्वाद हवा आहे. नागपूरच्या जनतेच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे. आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी हे अप्रत्यक्षरित्या तुटलेल्या युतीवरून आणि सत्तेतून बाहेर जाव्या लागलेल्या भाजपाला टोला लगावला. हे देखील वाचा- शिवभोजन थाळी उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी 11,274 थाळींची विक्री; ठाणे आणि नाशिक मधून मोठा प्रतिसाद
दरम्यान, शहरामध्ये वाहतूकीला चालना देणार्या या प्रकल्पाबद्दल नागपूरवासियांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. लोकमान्य नगर, बन्सी नगर, वासूदेव नगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर, अंबाझारी लेक व्ह्यू, लाड स्क्वेअर, शंकर नगर, इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी स्थानक असेल. उर्वरित 5 स्थानकं एप्रिल 2020 पर्यंत नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत.