Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अखेर सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केल्यापासून ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. त्यानंतर प्रदीर्घ काळ ते गायब होते. अनिल देशमुख यांनी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे यासाठी ईडीने अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र, अनेकदा समन्स बजावूनही ते कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यामुंले त्यांच्या विरोधात विविध वॉरंड जारी करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले.

ईडीने कारवाई करत त्यांची सुमारे 5 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांना विविध समन्सही पाठवले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आता पुढे काय कारवाई होणार याबाबत उत्सुकता आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर आणि वर्धा येथील घर आणि कार्यालयांवरही छापे मारले आहेत. एकदा नव्हे तर अनेक वेळा ही छापेमारी झाली आहे. दुसऱ्या बाजूला, अनिल देशमुख मात्र गायब होते. त्यामुळे विविध तपास यंत्रणा पाठीमागील पाच महिन्यांपासून त्यांचा शोध घेत होत्या. मात्र, देशमुख यांचा पत्ता लागत नव्हता. (हेही वाचा, Sanjay Nirupam On Parambir Singh: फरार झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लागला ठावठिकाणा, बेल्जियममध्ये असल्याचा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला दावा)

दरम्यान, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा ईडीचे समन्स आले तेव्हा आपण स्वत: कार्यालयात जाऊन आपली बाजू मांडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली माझी याचिका प्रलंबीत होती. सर्वोच्च न्यायालयातही मी याचिका दाखल केली होती. त्यामुळे या याचिकेचा निकाल लागला की मी स्वत: इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होईल, असे म्हटले होते. त्यानुसार आज मी इथे हजर झालो आहे. दुसऱ्या बाजूला माझ्यावर खोटे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मात्र गायब आहे. ते देशाबाहेर पळाल्याची बातमी आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.