Shivajirao Patil Nilangekar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांचे आज पुणे येथे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते. त्यापूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र आज (5 ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कॉंग्रेस नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे 1985-86 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा परिवार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासोबतच त्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसच्याप्रदेशाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी सांभाळली होती.

ANI Tweet

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 साली नणंद येथे झाला. पुढे लहानपणी शिक्षण गुलबर्गा येथे शालेय शिक्षण झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद ,नागपूर मध्ये झाले. 1962 पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली होती. पुढे त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या.

लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीमध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा सहभाग होता. संभाजी पाटील निलंगेकर  हे  शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात  संभाजी पाटील निलंगेकर यांचा सहभाग होता.

लातूर मधील निलंगा या त्यांच्या मूळ गावी  शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.