मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी (BMC Election) शिवसेनेकडून (ShivSena) मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या शिवसेनाप्रवेशानंतर मुंबईत शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता (Hemendra Mehta) यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी खासदार व शिवसेना सचिव अनिल देसाई, विभागप्रमुख विलास पोतनीस, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.
हेमेंद्र मेहता यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधत्व केलं असून त्याठिकाणी चांगले काम केले आहे. या मतदारसंघातून ते सलग तीनवेळा निवडणू आले आहेत. तसंच मुंबईत भाजपची बांधणी करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या मेहता यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शिवसेनेचा मार्ग निवडला. दरम्यान, मेहता यांच्या मतदारासंघातील छबीमुळे बोरीवलीत शिवसेनेला मजबूती मिळणार आहे. (मुंबईत भाजपला धक्का, माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिवसेना प्रवेश; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन)
ShivSena Tweet:
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/243jdXmd2i
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 6, 2021
यापूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे, समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर हेमेंद्र मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे गोरेगाव, विलेपार्ले पाठोपाठ बोरिवली या पश्चिम उपनगरातील तिन्ही प्रमुख भागांत शिवसेनेला आपली पकड मजबूत केली आहे.