Pooja Chavan आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- चित्रा वाघ
Pooja Chavan, Chitra Wagh and Forest Minister Sanjay Rathod (Photo Credits: Twitter/PTI)

पुण्यातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण (Pooja Chavan) या 22 वर्षीय मुलीने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुख्य म्हणजे या आत्महत्येशी संबंधित एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) समोर आली ज्यात एका कथित नेत्याचा समावेश असल्याचे उघड झाले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता भाजपकडून वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

"पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्यासमोर आलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 10 ते 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते तिची आत्महत्या झाल्यानंतर तिची मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री संजय राठोड त्या माणसाला सांगत आहेत, हे त्या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसेच पोलीस अद्यापही याप्रकरणी स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या कुटुंबियांवर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्दसद विवेकबुद्धी कायम ठेवून गुन्हा दाखल केला पाहिजे.", असं भाजप नेत्या चित्रा वाघ या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत.हेदेखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र

या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. हे पत्रक देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे की, "पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे.