Floods in Maharashtra: शिवसेनेचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द; राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Monsoon 2019: मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र महापुराच्या वेढ्यात अडकला असताना आता कुठे मुख्यमंत्री आणि राज्यातील राजकीय नेते पत्रकार परिषदा घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहून सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने आपले राजकीय कार्यक्रम रद्द केल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले. विशेष असे की, ज्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली त्याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील शेखर गोरे (Shekhar Gore) या नेत्याचा शिवसेना पक्षप्रवेश करण्यात आला.

राज्यातील पूरस्थिती भयानक आहे. आदित्य ठाकरे आणि मी पूरस्थीती असलेल्या ठिकाणी जाणं जसं शक्य होईल तसे जाणार आहोत. सध्या त्या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. पण, शिवसेनेचे आमदार आणि शिवसैनिक पूरस्थितीती असलेल्या पूरग्रस्तांना मदत करत आहेत, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

शेखर गोरे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेवर टीकेचा भडीमार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. घड्याळाचा त्याग करत गोरे यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा हातात घेतला. पण, या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेवर मात्र टीकेचा भडीमार होत आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला पूराचा फटका बसत असताना सत्ताधारी पक्ष मात्र पक्षविस्तार करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश करवून घेत असल्याची टीका केली जात आहे. (हेही वाचा, मुसळधार पाऊस, पूरस्थिती विचारात घेऊन सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी: शरद पवार)

दरम्यान, राज्यात मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने ही स्थिती विचारात घेऊन मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार आणि खासदार आपले एक महिन्याचे वेतन हे पूरग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.