कल्याण: चोर असल्याच्या संशयावरुन 48 वर्षीय बेघर व्यक्तीला जबर मारहाण केल्याप्रकरणी 5 जण अटकेत
Image used for Representational Purpose | (Photo Credits: stux/Pixabay)

चोर असल्याच्या संशयावरुन कल्याण मधील 48 वर्षांच्या व्यक्तीला 6 जणांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत 6 जणांपैकी 5 जणांना अटक केली आहे. मात्र एकाला तेथून पळ काढण्यात यश आले असले तरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित व्यक्तीचे नाव जोंगल लोहरा असे असून तो मूळचा झारखंडचा आहे. बेघर असल्याने  सध्या तो रस्त्यावरच आपले जीवन व्यथित करत होता. गुरुवारी (8 ऑगस्ट) सकाळी त्याचा मृतदेह कल्याण रेल्वे स्थानकाजवळील महालक्ष्मी हॉटेलजवळ मिळाला.

त्याचे हात-पाय बांधलेले असून त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींचा शोध घेतला. त्यापैकी पाच जण हे सुरक्षा रक्षक असून एकजण कुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (पिंपरी: दुकानात बेवड्यांचा हैदोस, मालकाच्या डोक्यात दारुच्या बॉटल्स फोडत केली मारहाण)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एकाच दिवसात आरोपींचा शोध घेतला मात्र त्यापैकी एकजण निसटला. संतोष जाधव, नवनाथ राठोड, मंगेश हमल, अनिश शेख आणि नूर अलार्म अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फरार असलेला आरोपी पोपट मामा म्हणून ओळखला जातो. (विरार: दारु पिण्यासाठी आलेल्या तरुणाला बिअर शॉपवर झालेल्या वादातून जबरदस्त मारहाण, आरोपी फरार)

रस्त्याच्या कडेला भाजी विकणाऱ्या एका महिलेने पीडित व्यक्तीला पाहिले आणि आरडओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो चोर असल्याच्या संशयावरुन आरोपींना त्याला बेदम मारहाण केली. पीडित व्यक्तीनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहा जणांनी मिळून त्याचे हात-पाय बांधले आणि त्याला जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र आरोपींनी तेथून पळ काढला.