Maratha Caste Certificate : जालना जिल्ह्यात वैभव ढेंबरे तरूणाला देण्यात आलं पहिलं मराठा जात प्रमाणपत्र
मराठा क्रांती मोर्चा ( प्रातिनिधिक फोटो) (Photo Credits: PTI)

Maratha Caste Certificate : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यंदा मराठा समाजाला (Maratha Reservation) शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर 16% आरक्षण दिले आहे. शासनाने निर्णय जारी केल्यानंतर नागरिकांना मराठा जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र उपलब्ध करून देण्याची सोय सुरू आहे. या अंतर्गत पहिले प्रमाणपत्र जालना जिल्ह्यातील अंबड येथील नागरिक असलेल्या वैभव ढेंबरे या तरूणाला देण्यात आले आहे.

वैभव ढेंबरे हा मत्सोदरी महाविद्यालयामध्ये बीसीएच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. अंबड येथील तहसील कार्यालयामध्ये महा ई सेवा केंद्रामध्ये वैभवने जात प्रमणपत्रासाठी अर्ज केला होता. कागदांची तपासणी झाल्यानंतर तहसील कार्यालयातून वैभवला पहिले मराठा जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. काही दिवसंपूर्वी सरकारकडून जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र अशा दोन्ही दाखल्यांचे नमुने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 % आरक्षण दिले असले तरीही न्यायालयात मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सादर करण्यात आली आहे. राज्यसरकारकडून वकील हरीश साळवे तर याचिकेला आव्हान करण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आपली बाजू मांडत आहेत. याप्रकरणादम्यान काही दिवसांपूर्वी न्यायालय आवारातच वकील सदावर्ते यांच्यावर हल्लादेखील झाला.