धक्कादायक! पुण्यातील व्यापाराची गोळ्या घालून हत्या; पाडेगावजवळील कॅनॉलजवळ सापडला मृतदेह
प्रातिनिधिक प्रतिमा

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे (Pune) येथील प्रसिद्ध व्यापारी चंदन शेवानी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. लोणंद जवळील पाडेगाव हद्दीत ही घटना घडल्याचे पोलिसांचा अंदाज आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, व्यापारी चंदन शेवानी यांचा मृतदेह पाडेगाव येथील एका कॅनॉलजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्या वेळी आरोपींनी चंदन यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह कॅनॉलजवळ टाकून पसार झाले असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लोणंद पोलीसात या गुन्हयाची नोंद झाली असून खूनाचे गुढ उकलण्यासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत झाली आहे.

आज सकाळी लोणंद जवळील पाडेगाव च्या हद्दीतील कॅनॉल लगत असणाऱ्या कच्या रस्त्यावर अज्ञात मृतदेह असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळाली.त्याप्रमाणे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळ्या घालून अज्ञाताचा खून करून मृतदेह पाडेगाव येथील कॅनॉल जवळ रात्रीच्या वेळी आणून टाकत खूनी पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेदेखील वाचा- उल्हासनगर: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवलं; नराधम पती फरार

मृतदेहावर ब-याच ठिकाणी जखमा असून गोळ्या घालून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. लोणंद पोलीसात याप्रकरणी गुन्हयाची नोंद झाली असुन, पुढील तपास सुरू आहे.

हत्येमागील कारण समोर आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.