Neelkamal Boat Accident in Mumbai (फोटो सौजन्य - ट्विटर)

Neelkamal Boat Accident in Mumbai: बुधवारी सायंकाळी मुंबईत नौदलाच्या बोटीला (Navy Boat) धडकल्यानंतर प्रवासी बोट उलटल्याने किमान 13 जणांना प्राण गमवावे लागले. नीलकमल बोट दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. कुलाबा पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्याच्या कलम 106(1), 125(a)(b), 282, आणि 324(3)(5) अन्वये एफआयआर (सीआर क्र. 283/24) नोंदवण्यात आला आहे. या घटेतून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार पक्षांची नावे आहेत.

मुंबईजवळ, बुचर बेटावर, नौदलाच्या बोटीला धडकल्यानंतर नीलकमल नावाची प्रवासी बोट दुपारी 3.55 च्या सुमारास उलटली. आतापर्यंत 101 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 13 जणांना या घटनेत जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 10 नागरिक आणि तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन गंभीर जखमींवर नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट दुर्घटनेत 13 जण मृत; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर- CM Devendra Fadnavis)

बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू -

भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी 11 जहाजे आणि चार हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत. अद्याप बोटीतील बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून 5 लाखांची मदत मिळणार आहे. या घटनेची पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे चौकशी करणार आहे. (हेही वाचा - Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता)

नीलकमल बोट दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार -

मुंबईच्या किनारपट्टीवर 13 जणांचा बळी घेणाऱ्या बोट अपघातानंतर, महाराष्ट्र मंत्री उदय सामंत यांनी अधिकृत चौकशीची घोषणा केली असून योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. 'नीलकमल बोट दुर्घटनेची चौकशी केली जाईल, आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. काही तांत्रिक त्रुटी असल्यास, ते समजण्यासारखे आहे, परंतु जर कोणी केवळ आनंद घेण्यासाठी स्पीडबोट चालवत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे,' असं उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.