Neelkamal Boat @airnews_mumbai

मुंबई मध्ये समुद्रात आज एक भीषण बोट अपघात झाला आहे. नीलकमल (Neelkamal Boat) या एलिफंटा कडे जाणार्‍या बोटीला नेव्हीच्या (Navy) बोटीची धडक बसल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातानंतर समुद्रात असलेल्या काही बोटी आणि नेव्हीच्या मदतीने प्रवाशांना तातडीने मदत करण्यात आली. दरम्यान या अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील नागपूर मधून माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, आपघातानंतर 101 जणांची सुटका करण्यात आली असून सुमारे 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (18 डिसेंबर) दुपारी 4 च्या सुमारास झाला आहे. अजूनही शोधकार्य सुरू असून उद्या सकाळ पर्यंत त्यांचे पुढील अपडेट्स मिळणार आहेत.

कसा झाला नीलकमल बोटीचा अपघात

प्रवासी बोटीला नेव्हीच्या बोटीची धडक बसली आहे. नेव्हीच्या बोटीला नवं इंजिन लावण्यात आलं होतं. त्यानंतर समुद्रात त्याचं ट्रायल घेत असताना बिघाड होऊन  नौदलाच्या बोटीवरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अतिशय वेगात असलेली ही बोट  नीलकमल च्या प्रवासी बोटीला धडक दिली आहे. सध्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.

स्पीड बोटची धडक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. 13 मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे कर्मचारी आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोघांना नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरचा वापर करून नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी बचावकार्य केले आहे.  या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.