सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाशी महाराष्ट्र (Maharashtra) कडवी झुंज देत आहे. अशात पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी असे अनेकजण या लढ्यात सामील आहेत. एकीकडे दिवसेंदिवस कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे तैनात कर्मचाऱ्यांच्या मृत्युच्याही बातम्या समोर येत आहेत. आता दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये (Saint George’s Hospital) कोविड-19 ड्यूटीवर कार्यरत असलेली 45 वर्षीय महिला कर्मचारी, बुधवारी लिफ्टमध्ये मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कोविड-19 रुग्णांच्या वॉर्डमध्ये तैनात होती.
आज दुपारी काही कर्मचार्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा ती आत मृत आढळली. अधिकाऱ्याने सांगितले की, या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती अद्याप समजू शकली नाही. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र लिफ्ट खराब झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. (हेही वाचा: औरंगाबाद येथे आणखी 30 जणांना कोरोनाची लागण; जिल्ह्यात एकूण 1 हजार 308 लोकांना संसर्ग)
याबाबत बोलताना हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे म्हणाले, ‘आमचा असा विश्वास आहे की लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर जाताना या महिलेचे केस लिफ्टच्या दरवाज्यामध्ये अडकले असतील व त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला असावा. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी अहवाल सादर करेपर्यंत आम्हाला कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे थांबवावे लागेल.’ दरम्यान, कोरोना व्हायरस हॉटस्पॉट मुंबईमध्ये आतापर्यंत कोविड-19 च्या संसर्गाची 32,791 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 1,065 लोकांचा मृत्यू झाला आहे.