Accident On Western Express Highway: पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, अनेकजण जखमी
Accident (PC - File Photo)

Accident On Western Express Highway: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Western Express Highway) शनिवारी टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ ऑटो-रिक्षा, मोटारसायकल आणि टेम्पो यांच्यात कारची धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident) एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. कार चालक आणि आरोपी, मिलन कोठारी आणि इतर तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एफआयआरनुसार, शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता कोठारी कांदिवलीहून दक्षिण मुंबईच्या दिशेने वेगाने कार चालवत होते. त्यांची कार प्रथम ऑटोरिक्षाला धडकली, त्यामुळे ती रस्त्यावर पलटी झाली. भरधाव वेगात आलेल्या कारने एका मोटारसायकलला आणि नंतर टेम्पोला धडक दिली.

दरम्यान, या अपघातात मोटारसायकलस्वार रस्त्यावर खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जवळच्या लोकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला, त्यांनी त्वरीत घटनास्थळी येऊन मोटारसायकलस्वाराला कांदिवली पूर्व येथील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अंधेरी येथील सोहनसिंग चना (64) असे पीडित तरुणाचे नाव आहे. (हेही वाचा - Mumbai Air Pollution: मुंबईचा एक्यूआय 295 वर, श्‍वसनाच्‍या आजारांत 50 टक्‍क्‍यांनी वाढ)

तथापी, या अपघातात बोरिवली पश्चिम येथील सखावत अन्सारी (44) या ऑटोरिक्षा चालकाच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले, तर तनुजा सहाणे (45) या प्रवाशाच्या पायाला दुखापत झाली. टेम्पो चालक विजय चव्हाण (49) याचा पाय फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी या सर्वांना कांदिवली पूर्व येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

अन्सारी यांनी कोठारीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 337 (जीवन धोक्यात आणणारे कृत्य), 338 (जीवन धोक्यात आणणाऱ्या कृत्यामुळे गंभीर दुखापत करणे) या कलमांसह गुन्हा दाखल केला. समता नगर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी सध्या त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय उपचार घेत आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत.