Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राजेश पांडे, संजय गुप्ता आणि अज्ञात चार जणांविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये एकूण सहा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या कोरोना लसीकरण (Fake Vaccination In Mumbai) केंद्र निर्माण करुन अनेकांचे लसीकरण (Covid 19 Vaccination) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राजेश पांडे, संजय गुप्ता यांच्या विरोधात बनावट लसीकरण केल्याप्रकरणी कांदिवली (Kandivali) आणि वर्सोवा (Versova) येथे आगोदरच दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 30 मे रोजी हिरानंदानी सोसायटीमध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले होते. याशिवाय मुंबईतील इतरही अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले होते.

मुंबईत झालेल्या बनावट कोरोना लसीकरणावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी तातडीने दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई महापालिकेने राबवलेले लसीकरण पूर्णपणे पारदर्शी असते. त्याची माहिती दिली जाते. तसेच, आगोदर त्याबाबत नागरिकांना कल्पना दिली जाते. कोरोना लसीकरण केंद्रेही निश्चित ठिकाणी उभारली जातात. त्यावर महापालिकेचे अधिकारी आणि आरोग्य अधिकारी लक्ष ठेऊन असतात. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनाही मुंबईतील बनावट लसीकरणाबाबत विचारले असता, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. ही चौकशी पूर्ण होऊ देत मग त्यावर बोलणे योग्य ठरेल अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. (हेही वाचा, Vaccination In Housing Societies: मुंबईच्या सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? घ्या जाणून)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबई शहरातील कोरोना संक्रमितांची संख्या हळूहळू घटताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना लाट उताराला लागल्याचे चित्र आहे. तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा एकदा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमनाचा वेग कमी झाल्याचे चित्र असले तरी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.