Fact Check- Snowfall in Mumbai: मुंबईमध्ये चेंबूर परिसरात स्नो फॉल? नव्हे नव्हे ह तर पावडर फॉल्ट; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Fact Check- Snowfall in Mumbai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईत (Mumbai) गारठा वाढला आहे. थंडीच्या दिवसात धुके पडणे ही काही नवी बाब नाही. नियमीत नाही पण कधीकधी मुंबईतही हे दृश्य पाहायला मिळते. मात्र, पाठिमागील एक दोन दिवसात मुंबईकर नागरिकांना चेंबूर (Chembur ) परिसरात काहीसा विचित्रच प्रकार पाहायला मिळाला. आकाशातून पावसासारखे पांढऱ्या रंगाचे काहीतरी पसरत होते. रस्त्यांवरील वाहनांवर, जमीनीवर त्याचा पांढरत थरही पसरला होता. पण, हे नेमके काय याबाबत कोणालाच माहिती नव्हते. लोकांना वाटले हा स्नो फॉल (Snowfall )आहे. काही उत्साही मंडळींनी तर मुंबईतील चेंबुर परिसरात स्नो फॉल (Snowfall in Mumbai) असे सोशल मीडियावर जाहीरही करुन टाकले. पण, जेव्हा या घटनेच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र लक्षात आले की, हा प्रकार स्नो फॉलचा नाही. हा पावडर फॉल्ट (Powder) आहे. जाणून घ्या काय आहे हा प्रकार आणि तो घडला तरी कसा? मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) याबाबत अधिक माहिती दिली आहे.

मुंबई परिसरातील चेंबूर येथील वाशिनाका परिसरातील गव्हाणगाव येथील एचपीसीएल प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणावर कॅटालिस्ट पावडर गळती झाली. गळती इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, संपूर्ण गव्हानगाव परीसर पावडरमय झाला. त्यात शनिवारी दत्तजयंती असल्याने नागरिकांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. त्यामुळे नागरिकांची ठिकठीकाणी गर्दी झाली होती. याच वेळी या गळतीमुळे हवेत आणि परीसरात पावडरचे साम्राज्य पसरले. वातावरणात मिसळलेली ही पावडर हळूहळू जमीनीच्या दिशेने येऊ लागली. इतकी की रस्त्यावरील वाहने आणि उघडी जमीनही पांढरी झाल्याचे दिसू लागले. नागरिकांना हा प्रकार काहीसा नवीन होता. त्यामुळे लोकांना वाटले मुंबई स्नो फॉल सुरु झाला आहे. लोकांमध्ये अनेक समज, गैरसमज आणि चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, कोणीतरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. (हेही वाचा, सोलापूर: कारखान्यात विषारी वायूची गळती झाल्याने 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू)

मुंबई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आवश्यक हालचालींना वेग आला. मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड, स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनातील विविध विभागाचे लोकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर संबंधित विभागाने योग्य माहितीच्या आधारे नेमकं काय आणि कशामुळे घडले आहे याचा शोध घेतला. त्यानंतर घडल्या प्रकाराबाबत प्रशासनाने नागरिकांना माहिती दिली.

काय घडले नेमके?

चेंबूर येथील गव्हानवाडी परीसरात एचपीसीएल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमधून कॅटालिस्ट पावडरची गळती झाली होती. त्यामुळे ही पावडर हवेद्वारे वातावरणात मिसळली. त्यामुळे या भागात पावडरचे थर पाहायला मिळाले. दरम्यान, ही पावडर विषारी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, संबंधित प्लांट सध्या बंद ठेवण्यात आला आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊनच तो पुन्हा सुरु करण्यात येईल, असे कंपनी प्रशासनाने म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल. तसेच, काही हालगर्जीपणामुळे ही गळती झाली असेल तर दोषींवर कारवाईसुद्धा करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.