Independence Day 2020: प्लॅस्टिक, कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्याची स्थापना
Image For Representation (Photo Credits-Pixabay)

Independence Day 2020: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात, असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कंर्ला या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपुर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. (हेही वाचा - Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महापालिकेचे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई)

यंदा स्वातंत्र्यदिनावर कोरोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे यावर्षी अगदी साध्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला शासकीय इमारती तिरंगी रंगाच्या लाईट्सने सजल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स, सिद्धीविनायक मंदिर, आदी ठिकाणी तिरंगी रंगाची उधळण पाहायला मिळत आहे.