Hijab Controversy: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची 'हिजाब' वादावर प्रतिक्रिया
Aaditya Thackeray | (Photo Credit: ANI/Twitter)

शाळा, कॉलेजमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष द्यायला हवे, इतर वादांवर नाही, अशा शब्दात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हिजाब वादावर (Hijab Controversy) प्रतिक्रिया दिली आहे. शाळांमध्ये गणवेश ठरलेला असतो. या गणवेशाच्या नियमांचे पालन व्हावे. शाळा या शैक्षणिक केंद्र आहे. त्या ठिकाणी शिक्षणावरच लक्ष दिले गेले पाहिजे. धार्मीक किंवा इतर कोणतेही राजकीय नेते शाळा महाविद्यालयांमध्ये येता कामा नयेत, अशी भूमिका आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray On Hijab Controversy) यांनी मांडली आहे.

हिजाब परिधान करण्यावरुन कर्नाटकमधल्या शाळा महाविद्यालयांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. वादाची पार्श्वभूमी पाहता कर्नाटक राज्य सरकारने महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा वाद आता राष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे. अनेक राजकीय नेते, पक्ष, संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावर आपापली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. देशभरात या मुद्द्यावरुन राजकारण सुरु आहे. (हेही वाचा, Property Tax Exemption In Mumbai: मविआ सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट, मुंबईकरांचा 500 चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ)

ट्विट

कर्नाटक राज्यातील उडुपी येथील एका शासकीय महाविद्यालयातून हा वाद निर्माण झाला. या महाविद्यालयात 6 जानेवारी रोजी 6 मुस्लिम तरुणींना हिजाब परिधान करुन वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले. महाविद्यालयाचे गणवेशाबाबत धोरण आहे. त्याचे पालन केले जावे, असे सांगत या तरुणींना महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. या प्रकारानंतर या विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत हिजाब परिधान करून वर्गात बसू न देणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि 25 या अंतर्गत हिजाब घालून वर्गात बसू देण्यात परवानगी आहे. असे असताना मुलभूत अधिकारापासून महाविद्यालयाने वंचित ठेवण्यात आल्याचा दावा विद्यार्थिनींनी याचिकेत केला आहे.