ED summons to Avinash Bhosale: बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स, Money Laundering प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Avinash Bhosale (Photo Credits-Twitter)

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) समन्स बजावले आहे. या समन्सनुसार मनी लॉन्ड्रींग (Money Laundering Case) प्रकरणात चौकशीसाठी त्यांना ईडी (ED) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्स प्राप्त झालेले व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) ईडी कार्यालयात उपस्थित राहून चौकशीला सामोरे जातात की काही कारण देऊन चौकशी टाळतात याबाबत उत्सुकता आहे.

अविनाश भोसले यांचे चिरंजीव अमित भोसले यांनाही ईडीद्वारे समन्स बजावण्यात आले आहे. आज (1 जुलै) अविनाश भोसले यांची तर उद्या (2 जुलै) अमित भोसले यांची चौकशी होणार असल्याचे समजते. अविनाश भोसले यांनी पुण्यातील एका भूखंडावर बांधकाम केले आहे. हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचा दावा आहे. त्यामुळे सरकारी जमीनीवर बांधकाम केल्याचा भोसले यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातही ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Builder Avinash Bhosale: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, इडीची कारवाई)

अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतू, उच्च न्यायालयाने भोसले यांना दिलासा देण्यास नकार दिला. उलट चौकशीला सामोरे जा असा आदेशच न्यायालयाने दिला. न्यायालयातून दिलासा मिळविण्याचा भोसले यांचा पर्यायही निकाली निघालाआहे. त्यामुळे भोसले यांच्याकडे आता ईडीच्या चौकशीला सामारे जाण्यावाचून कोणताही पर्याय सध्यातरी दिसत नाही.

दरम्यान, ईडीने या आधी मोठी कारवाई करत अविनाश भोसले यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अविनाश भोसले आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या नावे असलेली ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (Exchange Management Act) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अविनाश भोसले हे बांधकाम आणि गुंतवणूक व्यवसायातील बरेच मोठे नाव आहे. याशिवाय अनेक मोठ्या मराठी उद्योजकांपैकी एक उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची दोन वेळा चौकशी झाली आहे. त्यावेळी त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्यांची चौकशी होत आहे.