प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसले आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या नावे असलेली ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (Exchange Management Act) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. अविनाश भोसले हे बांधकाम आणि गुंतवणूक व्यवसायातील बरेच मोठे नाव आहे. याशिवाय अनेक मोठ्या मराठी उद्योजकांपैकी एक उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे.
अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भोसले यांच्या विदेशी सुरक्षितता किंवा मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. फेमा कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीच्या देशी आणि विदेशी मालमत्ता जप्त करता येतात. (हेही वाचा, पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव)
भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्यांचे समभाग, विविध शहरांमधील गुंतवणूक, मालमत्ता तसेच, पुणे येथील क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत असले्या पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. हॉटेल वेस्टिन- पुणे (Hotel Westin, Pune), हॉटेल ले मेरिडियन- नागपूर (Hotel Le Meridian), हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा ( Hotel W Retreat and Spa, Goa) अशी या हॉटेल्सची नावे आहेत.
ईडी ट्विट
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021
दरम्यान, भोसले यांच्या या संपत्तीसोबतच एबीआयएल- अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL-Avinash Bhosle Infrastructure Private Limited)) मधील इक्विटी शेअर्स आणि भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यात सुमारे 1.15 कोटी रुपयांची बँक शिल्लक ताब्यात घेण्यात आली आहे.