औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार? वाचा सविस्तर
Elections | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यानंतर राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोठी मुसंडी मारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांची निवडणुका फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते. यासंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेसाठी 111, तर औरंगाबाद महापालिकेत 113 जागासाठी निवडणूक होणार आहे. याशिवाय, वसई-विरार 115, कल्याण- डोंबिवली आणि कोल्हापूर 81 जागेवर निवडणूक होणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला होता. मात्र, राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मोठी मुसंडी मारेल, असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वर्तविले आहे. यामुळे येत्या अगामी निवडणुकीत भाजप कोणती भूमिका साकारते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Beed: भाजप नेत्याच्या कारखान्यातून चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असले तरी काँग्रेसने कंबर कसली असून काँग्रेसचे सर्व नेते मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. काँग्रेसला आणखी उभारी देण्यासाठी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधत सर्व तयारी सुरु केलेली आहे. राज्यात सत्ता आहेच, त्यात तीन पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे फारसे अवघड नाही हा आत्मविश्वासही कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागल्याने भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.