Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

CM Step Down News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पायऊतार होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेला पूर्णविराम मिळावा यासाठी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही स्पष्टीकरण दिले. राज्यात मुख्यमंत्री बदलाचा कोणताही विचार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. असे असले तरी राजकीय वर्तुळातील चर्चा आणि कुजबूज मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सर्वांना उत्सुकता आहे ती 10 ऑगस्ट या दिवसाची. या दिवसापर्यंत विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घ्यायचा आहे.

'अजित पवार यांना पूर्वकल्पना'

काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वात आधी म्हटले होते की, एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरेल. न्यायालयाने दिलेल्या आदेश आणि निर्णयानुसार विधानसभा अध्यक्षांना कमीत कमी वेळात आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. अध्यक्ष हा कालावधी जास्तीत जास्त 10 ऑगस्ट पर्यंत वाढवू शकतात इतके, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेची व्याप्ती वाढत असलेले पाहून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगून टाकले की, एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री आहे आणि राहतील. इतर कोणीही मुख्यमंत्री राहणार नाही. आमचे सहकारी अजित पवार यांनाही तशी कल्पना देण्यात आली आहे. (हेही वाचा, Disqualification नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ द्या- शिवसेना MLA)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार

दरम्यान, काँग्रेस आमदार (विधानपरिषद) अभिजीत वंजारी यांनी पुन्हा एकदा राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना नवे बळ दिले. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वंजारी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री नुकतेच दिल्लीला सहकुटूंब गेले. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पण ही भेट म्हणजे त्यांच्या निरोपाची तयारी तर नाही ना? अशी चर्चा सुरु आहे. विधानसभा अध्यक्षांना येत्या 10 किंवा 11 ऑगस्टपर्यंत हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. हे आमदार अपात्र आहेत किंवा नाही याबाबत त्यांना काहीतरी निर्णय द्यावाच लागेल. त्यामुळे या निर्णयानंतर शिंदे यांना निरोप देऊन मुख्यमंत्री पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात घातली जाईल, अशा आशयाची मांडणी अभिजित वंजारी यांनी केली आहे.