एखाद्या हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल उपस्थित करत सय्यद शुजा (Syed Shuja) या हॅकरने भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या मृत्यूबाबत केलेला दावा भाजपने खोडून काढला. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadase ) यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवत भाजपला खडसावलेही आहे. हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल उपस्थित होत असेल तर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला? असा रोखडा सवाल उपस्थित करत खडसे यांनी भाजपला खिंडीत गाठले आहे. तर, दुसऱ्या बाजूला माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास ठेवला यामुळे माझं राजकीय आयुष्य बरबाद झालं, अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ईव्हीएम हॅकिंगबद्दल गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने केला होता. भाजपाने हा दावा खोडत हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. तोच धागा पकडून खडसे यांनी स्वपक्षालाच खिंडीत पकडले आहे. हॅकर खोटारडे असतात तर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला असा सवाल केला आणि यामुळे माझं राजकीय आयुष्य बरबाद झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी नेमके प्रश्न उपस्थित केले. खडसे यांच्या या विधानांमुळे खडसे यांनी भाजपला खडसावले. तसेच, पक्षात त्यांना मिळत असलेल्या वागणूकीमुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. दरम्यान, त्यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना खडसे म्हणाले की, माझ्यावरही एका हॅकरने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत आरोप केला होता. प्रत्यक्षात चौकशी झाली तेव्हा मात्र काहीच हाती लागले नाही. यात माझे राजकीय आयुष्य मात्र बरबाद झाले. मुंडे यांच्या बाबतीत हॅकरवर विश्वास ठेवला जात नाही तर, माझ्या प्रकरणात का ठेवला, असे खडसे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, गोपीनाथ मुंडे गूढ मृत्यू प्रकरण: हॅकरच्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या... )
भाजपचे दिवंगत नेते गोपीनात मुंडे यांचा मृत्यू अपघाती झाला नाही. तर, ती हत्या होती. भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम (Electronic voting in India) हॅक केले होते. या प्रकाराची भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सय्यद शुजा याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. हे वादळ अद्यापही भाजपच्या डोक्यावर घोंगावत आहे.