गोपीनाथ मुंडे गूढ मृत्यू प्रकरण: हॅकरच्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया म्हणाल्या...
Pankaja, Gopinath Munde | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Gopinath Munde mysterious death case: भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गूढ मृत्यूबाबत सय्यद शुजा (Syed Shuja) नावाच्या हॅकरने खळबळजनक दावा केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. या सर्व प्रकारात गोपीनाथ मुंडे यांची कन्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मौन बाळगले होते. मात्र, नुकतेच त्यांनी मौन सोडत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'मी हॅकरही नाही, तपास यंत्रणाही नाही आणि महत्त्वाचे म्हणजे या विषयाचं राजकारण करणारी राजकारणीही नाही', अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी हॅकरचा दावा आणि त्यानंतर सुरु झालेल्या वादळावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत सीबीआयने चौकशी केली आहे. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सीबीआय चौकशीही झाली आहे. तसेच, इव्हीएम हॅक होऊ शकत नाही. हे सिद्ध झालं आहे. या दोन्ही गोष्टींची नोंद देशातील मोठी लोकं घेतील, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, गोपीनाथ मुंडे यांचा झाला होता खून; 2014 च्या निवडणुकीवेळी EVM च्या हॅकिंगची होती कल्पना)

भाजपचे दिवंगत नेते गोपीनात मुंडे यांचा मृत्यू अपघाती झाला नाही. तर, ती हत्या होती. भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम (Electronic voting in India) हॅक केले होते. या प्रकाराची भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना कल्पना होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सय्यद शुजा याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.