लंडन (London) येथील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) ला हॅक करण्यासाठीचे डेमॉनस्ट्रेशन देताना, अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची हत्या या हॅकिंगमुळेच झाली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. सय्यद शुजा (Syed Shuja) असे या व्यक्तीचे नाव असून, 2014 सालच्या निवडणुकीदरम्यानही हे EVM हॅक करण्यात आले होते, त्यामध्ये छेडछाड झाली होती, त्या निवडणुका आधीच फिक्स होत्या त्यामुळेच भाजप सत्तेत आले असेही याचे म्हणणे आहे. दिल्लीमधल्या 2015 मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि 'आप' पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकल्या अन्यथा भाजपाने निवडणुका जिंकल्या असत्या असे शुजाने म्हटले आहे. आपल्याकडे हॅकिंग कसे झाले याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असा दावाही त्याने केला आहे.
सय्यद शुजा याने व्हिडिओ कॉन्फरन्सचा माध्यमातून लंडन येथे लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून, त्यात त्याने अनेक गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. यातील सर्वात मोठा दावा म्हणजे गोपीनाथ मुडे यांचा मृत्यू. मुंडे साहेबांचा मृत्यू अपघाती झाला नसून, त्यांना EVM कसे हॅक करायचे हे माहित होते. त्यामुळेच त्यांचा खून करण्यात आला असे या हॅकरचे म्हणणे आहे.
EVM मशीनचे डिझाईन जिथे तयार होते त्या कंपनीचा शुजा हा माजी कर्मचारी आहे. त्याच्या दाव्यानुसार गोपीनाथ मुंडे त्यांच्याकडे हॅक न होणारे EVM तयार करावे यासाठी गेले होते. 120 दिवसांमध्ये कंपनीने हे मशीन तयार केले, मात्र ते हॅक कसे करायचे याची मुंडे साहेबांना कल्पना होती. 2014 च्या निवडणुकीमध्ये या EVM सोबत छेडछाड झाली, त्यामुळे देशात भाजपची सत्ता येऊ शकली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा खून करण्यात आला असल्याचा दावा या हॅकरने केला आहे.
दरम्यान, याबाबत देशात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजपने पत्रकार परिषद घेऊन ही कॉंग्रेसची नवी खेळी असल्याचे, हा निवडणूक व्यवस्थेला बदनाम करण्याचा डाव आहे सांगितले आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू नाही, त्यात घातपात असावा, याचे गूढ अजूनही उकलले नाही. याबद्दल मी अजूनही ठाम आहे’ असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.