Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महादेव सट्टेबाजी अॅप प्रकरणातील 14 आरोपींविरुद्ध शुक्रवारी रायपूर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात (Prevention of Money Laundering Act) 8 हजार 887 पानांची फिर्याद दाखल केली. आरोपींमध्ये किंगपिन सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, विकास छापरिया, चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, अनिल दममानी, सुनील दममानी, विशाल आहुजा, धीरज आहुजा, सृजन असोसिएट्स मार्फत पुनाराम वर्मा, शिवकुमार वर्मा, यशोदा वर्मा आणि पवन नाथानी यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या तक्रारीत, ईडीने नमूद केले आहे की या प्रकरणातील गुन्ह्याची रक्कम अंदाजे 6000 कोटी रुपये आहे. एजन्सीच्या सूत्रांनी पुढे दावा केला की ईडीने 41 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. (हेही वाचा - Mahadev Betting App Case: रणबीर कपूरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ED ची नोटीस; चौकशीसाठी बोलावले)
काय आहे नेमकं महादेव बेटिंग अॅप प्रकरण ?
महादेव बुक कंपनीवर बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्सना नवीन वापरकर्ते पुरवणे, बेनामी बँक खाती चालवणे, निधीचा गैरवापर करणे आणि हवाला व्यवसाय चालवणे असे आरोप आहेत. महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी गेमिंग अॅप म्हणून वर्णन केले आहे, परंतु तपास यंत्रणेने आधीच संशय व्यक्त केला आहे की याद्वारे बेटिंग आणि बेकायदेशीर कृत्य केलं जातं आहे.
महादेव बुक हे अनेक ऑनलाइन गेमिंग वेबसाइट आणि अॅप्सचे सिंडिकेट आहे. त्याचे मुख्यालय UAE मध्ये आहे आणि ते तेथून चालते. या अॅप्लिकेशनची कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळमध्येही आहेत. हे क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोकर आणि कार्ड्ससह विविध लाइव्ह गेम्सवर बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते.
छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी मिळून हे अॅप सुरू केले. 2017 मध्ये सुरू झालेल्या या अॅपची पोहोच 2020 मध्ये कोविड काळात खूप वाढली आणि 2022 पर्यंत करोडो वापरकर्त्यांना या प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेला. या अॅपवर 500 रुपयांपासून बेटिंग सुरू झाली. असा आरोप आहे की या सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सट्टेबाजीचे पर्याय अशा प्रकारे तयार केले गेले होते की खेळाडूला त्याचे पैसे नेहमी गमवावे लागतील आणि कंपनी नेहमीच नफ्यात राहील.