PMC Bank Scam: पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (Punjab and Maharashtra Co-operative) घोटाळा प्रकरणात आज (3 डिसेंबर 2019) तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. जगदीश मुखे (Jagdish Mookhey), मुक्ति बावीसी (Mukti Bavisi) आणि तृप्ती बने (Trupti Bane) अशी या संचालकांची नावे आहेत. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा विभागाने (Mumbai Police Department of Financial Crime Branch) ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तीनही संचालकांना मुंबई न्यायालयासमोर उद्या (बुधवार, 4 डिसेंबर 2019) हजर केले जाणार आहे.
पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank scam) उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँक खातेधारकांमध्ये मोठी नाराजी होती. तसेच, या घोटाळ्याची लवकरात लवकर चौकशी करुन ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत होती. दरम्यान, आरबीआय आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून गेले प्रदीर्घ काळ तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आज काही संचालकांना अटक करण्यात आली.
पीएमसी बँक (PMC Bank) खातेधारकांना सुरुवातीला आपल्या खात्यातून रक्कम काढण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, पुढे हळूहळू हे निर्बंध शिथील करत आरबीआयने ग्राहकांना खात्यावरील पैसे काढण्यास मान्यता दिली. आता बँकेच्या सुमारे 78 टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातील ही रक्कम पूर्णपणे काढून घेण्यास मान्यता आहे. मात्र, खातेधारकांना ही रक्कम मोठ्या प्रमाणावर एकाच टप्प्यात काढता येणार नाही. तर, ग्राहकांना एका वेळी केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. (हेही वाचा, PMC Bank Crisis: पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंहला अटक)
एएनआय ट्विट
Maharashtra: Economic Offences Wing, today, arrested 3 Directors of the Board of Punjab and Maharashtra Co-operative (PMC) Bank Jagdish Mookhey, Mukti Bavisi and Trupti Bane. They will be produced before a Mumbai court tomorrow. pic.twitter.com/caKgCqq7zY
— ANI (@ANI) December 3, 2019
दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा हे एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे प्रकरण आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँक समन्वयाने तोडगा काढण्याबाबत पावले टाकत आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ, शिक्षणातील अडचणी, तसेच अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या तक्रारी आदी कारणासाठी बँक खात्यातून पैसे काढण्यास खातेधारकांना मुभा दिली आहे.दरम्यान, अशा प्रसंगी रक्कम काढायची असेल तर त्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत आहे.