PMC Bank Crisis: पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंहला अटक
PMC Bank and Mumbai Police personnel. (Photo Credit: PTI)

पीएमसी बँकेचे (PMC Bank) माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंह यांचा मुलगा रजनीत सिंहला (Rajneet Singh) आज अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ही कारवाई केली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दोन लेखापरीक्षकांना अटक केली गेली होती. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे. नुकतेच 11 नोव्हेंबर रोजी पीएमसी बँकेच्या सुमारे 400 ठेवीदारांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली होती. या मिटिंगनंतर  पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

दोन तास चाललेल्या या मिटिंगमध्ये, दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि ठेवीदारांचे पैसे वसूल करण्यासाठी पोलिस कार्यवाही करतील व शक्य ती मदत करतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फ काही कॉर्पोरेट संस्थांना कर्ज देताना कथित अनियमिततेची चौकशी केली जात आहे. ईओडब्ल्यूने आतापर्यंत 4.355 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये, एचडीआयएल ग्रुपचे प्रवर्तक आणि बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जणांना अटक केली आहे.

आता पोलिसांनी बँकेच्या माजी संचालकांनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक (PMC Bank) खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने खातेधारकांना दिलासा देत बँक खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेत 10 हजारांनी वाढ केली आहे. त्यामुळे पीएमसी बँक खातेदारांना आपल्या बँक खात्यातून थेट 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी काढता येणार आहे. या आधी खातेधारकांना केवळ 40 हजार रुपये इतकीच रक्कम ग्राहकांना काढता येत होती. (हेही वाचा: PMC बँक ग्राहकांना RBI कडून दिलासा, खातेदारांना खात्यातून काढता येणार 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम)

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत. बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.