मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळ मुख्यालयाच्या इमारतीत लिफ्ट दुरुस्तीदरम्यान अपघात; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळ मुख्यालयाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) इमारतीत लिफ्ट दुरुस्तीदरम्यान भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात कर्मचारी रामानंद पाटकर यांचा मृत्यू झाला आहे. पाटकर या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना आज दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास घडली. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाच्या इमारतीत लिफ्ट दुरुस्ती करताना हा अपघात झाला. या लिफ्टचे काम इलेक्ट्रीशियन रामानंद पाटकर (वय 55) हे कर्मचारी करत होते. दुरुस्ती दरम्यान, पाटकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एसटी महामंडळाच्या इमारतीतील लिफ्ट अनेकदा नादुस्त पडत होती. त्यामुळे या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम चालू होते.

हेही वाचा - सातारा: पसरणी घाटात शिवशाही बस अपघात, 33 जण गंभीर जखमी

दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाटकर यांच्या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांकडून एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे.