Drunken Women Attacks Police Officers: वसई (Virar Crime News) परिसरातील एका पब परिसरात तीन मद्यधुंद तरुणींनी चांगलाच गोंधळ घातला. या तरुणींनी दारुच्या नशेत परस्परांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर या तरुणींनी वाद सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला केला. त्यातील एका तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याचे मनगट चावले. तसेच, एकमेकींचे कपडेही फाडले. ही घटना 'पंखा फास्ट' (Pankha Fast Pub) नावाच्या पब परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होतो आहे. स्थानिक रहिवाशांना दिलेल्या त्रासाबद्दल या तरुणींवर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या तरुणांच्या या धक्कादायक वर्तनाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिला पोलीस कॉन्स्टेबलचे केस ओढले, कपडे फाडले
एनडीटीव्ही मराठीने दिलेल्या वृत्तनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुणी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. तसेच, तरुणींचा वाद मिटविण्यासाठी आणि पब परिसरात शांतता प्रस्तापीत करण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांवरही हल्ला केला. काव्या प्रधान (वय-22) आणि अश्विनी पाटील (वय-31) अशा दोन प्रमुख आरोपींचे नाव आहे. तिसऱ्या तरुणीचे पूनम असल्याचे समजते. दरम्यान, काव्या प्रधान हिने महिला पोलीस कॉन्स्टेबल उत्कर्षा वंजारी यांचे केस ओढले. तसेच, त्यांचा गणवेशही फाडला. दरम्यान, अश्वीनी पाटील हिने आणखी एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेतला आणि त्यांच्याशी हिंसक वर्तन केले. (हेही वाचा, नाशिक: तरुण-तरुणींच्या गटात 'फ्री स्टाईल' हाणामारी; सिडको कॉलेज परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद)
पोलीस हवालदाराच्या डोक्यात बादली घातली
दरम्यान, काव्या प्रधान नामक तरुणी इतकी बेधुंद झाली होती की, तिने पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यात बादली घातली. पबमध्ये असलेल्या महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर यांनी मध्यस्थी करत महिला पोलिसांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेच्या अंमलामध्ये असलेल्या तरुणींनी भोईर यांचे टी-शर्ट फाडले आणि त्यांच्यावर हल्ला केला. (हेही वाचा, Aurangabad: गाणे बंद केले म्हणून बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण, औरंगाबाद येथील तरूणांचा राडा)
व्हिडिओ
अर्नाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही मद्यधुंद महिलांना पकडले आणि पोलीस वाहनातून पोलिस स्टेशनला नेण्यात आले. तिघींवरही गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, तिन्ही तरुणींवर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे, शांतता भंग करणे, सरकारी कामात अडथळा आणने, पोलिसांवर हल्ला आणि शिवीगाळ करणे, पोलिसांची सामाजिक प्रतिमा मलीन करणे अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. तरुणींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे काय, तसेच त्यांनी या आधीही असे वर्तन केले आहे काय, याबाबत तपास सुरु आहे.