
पंढरपूर ते अकोट (Pandharpur-Akot) दरम्यान एसटी बसचा चालक-वाहक हा दारूच्या नशेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेतच चालकाने गाडी चालवल्याने एसटी मध्ये असलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान या प्रकाराची प्रवाशांनी परिवहन विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर आता कारवाईला सुरूवात झाली आहे. प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
एसटी बस ही अकोट डेपोची होती. त्यामध्ये एसटी बस चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे यांची ड्युटी होती. दरम्यान हे दोघे दारू पिऊन कामावर असल्याचे समोर आले आहे. प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये 37 प्रवाशी प्रवास करत असून या साऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोठा अनर्थ टळला आहे. बस चालकाचा बेजवाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
ही घटना गुरूवारची आहे. यामध्ये सुरूवातीला बस चालक वाहक नशेत असल्याचा प्रवाशा6ना संशय आला. मात्र रात्री उशिरा वाहक गाडीतच लोळत असल्याने आणि चालक नीट गाडी चालवत नसल्याने सारे प्रवासी घाबरले होते. प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांना तातडीने फोन करून माहिती देण्यास सुरूवात केली. एका प्रवासी महिलेने या प्रकाराचा व्हिडिओ देखील केला आहे. त्यांना बाहेर अंधार असल्याने आणि पाऊसही कोसळत असल्याने बाहेर पडणं असुरक्षित वाटत होते.