Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University (PC - Twitter)

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.सुभाष रामभाऊ चौधरी (Dr Subhash Chaudhari) यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) कुलगुरूपदी (Vice Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्य असलेल्या डॉ.सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ.चौधरी यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ दिनांक 7 एप्रिल रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. (हेही वाचा - Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होणार; असा करा अर्ज)

डॉ.सुभाष चौधरी यांचा जन्म 18 मे 1965 मध्ये झाला. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

या समितीत कानपूरच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय चंहादे यांचा समावेश होता. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.